मेथीची भाजी

मेथीची भाजी ही अत्यंत पौष्टिक असते यात भरपूर प्रमाणात प्रोटीन, जीवनसत्त्वे व कॅल्शिअम, मॅग्नेशियम, लोह यांसारखी खनिजे असतात. तसेच यातील तंतुमय पदार्थ आपला कोठा स्वछ राखण्यास मदत करतात.

म्हणून रोजच्या आहारात याचा समावेश करणे अत्यंत फायद्याचे ठरते.

ही भाजी बाळंतिणीसाठी अतिशय उपयुक्त आहे, खालील कृतीत मिरची चा वापर कमी करून पातळ भाजी करून बाळंतिणीला देता येते.



साहित्य:
  • मेथीची जुडी – १.
  • शेंगदाणे – १/२ वाटी.
  • हिरव्या मिरच्या -  ३ ते ४.
  • लसूण – ७ ते ८ पाकळ्या.
  • जिरे – चिमूटभर.
  • मीठ - चवीनुसार.
  • तेल – ४ ते ५ टी स्पून.

कृती:
  • मेथीची भाजी पाने आणि पानालगत कोवळ्या बारीक कड्यांसाहित निवडून घ्या.
  • ही भाजी एका मोठ्या पातेल्यात कोमट पाणी घालून त्यात टाका व थोडी अलगद ढवळा. व ती पातेल्यातच राहू द्या त्यामुळे भाजीतले माती व जंतू खाली तळाला जातात शिवाय भाजीचा कडवटपणा कमी होतो
  • आता शेंगदाणे धुवून ती मंद आचेवर तव्यावर खरपूस भाजून घ्या, ह्यास साधारण ६ ते ७ मिनीटे लागतील.
  • आता भाजलेले शेंगदाणे थोडे कोमट झाले की त्यावर वाटीच्या साहाय्याने दाब देऊन साले काढून घ्या.
  • आता मिक्सर मध्ये हे शेंगदाणे, मिरच्या, लसूण, जिरे व किंचित मीठ घालून जाड भरडे वाटण करुन घ्या. हे वाटण वाटताना मिक्सर चालू बंद करून वाटावे.
  • आता एका तव्यावर थोडे तेल तापवून वाटलेले वाटण १ मिनीटे छान परतवून घ्या. हे वाटण सतत फिरवुन परतून घ्या अन्यथा ते तव्यावर चिकटते.
  • आता यात पातेल्यातून वरच्यावर मेथीची भाजी काढून घाला, भाजी पिळुन घेऊ नये.
  • व भाजी १ ते २ मिनीटे चांगली परतवून घ्या. व मीठ घालून पुन्हा परतवून घ्या.
  • नंतर एक जाड थाळी उपडी ठेवून भाजी छान शिजू द्या. ही भाजी मधून मधून परतावत राहा जेणेकरून ती करपत किंवा चिकटत नाही.
  • आता ह्यात वरून आणखी थोडे तेल घाला व परतवून घ्या.
  • ही भाजी शिजायला साधारण ४ ते ५ मिनीटे लागतील ही भाजी अगदी कोरडी होईपर्यंत शिजवू नये, ती थोडी ओलसरच ठेवावी.
  • ही भाजी ज्वारीची किंवा बाजरीच्या भाकरी बरोबर उत्तम लागते.
  • तसेच ही चपाती आणि भाताबरोबरही छान लागते.
  • तर ही भाजी नक्की करून पाहा, आवडल्यास कंमेंट,लाईक आणि शेअर करा.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बटर पनीर मसाला

वांग्याचं भरीत