हरा भरा कबाब
पालक, बटाटा आणि हिरवे मटार वापरून केला जाणारा अतिशय पौष्टीक परंतु चटपटीत असा लहानांपासून मोठ्यांच्या आवडीचा तसेच, पार्टी स्नॅक्स किंवा घरी नाश्त्यासाठी सहज व कमी तेलात करता येईल असा रेस्टॉरंट स्टाईल प्रसिद्ध भारतीय पदार्थ.
साहित्य:
- उकडलेले बटाटे - २ लहान.
- हिरवे ताजे मटार -१ वाटी.
- पालकची पाने - १ वाटी किंवा प्युरी १/४ चहाचा कप.
- बारिक चिरलेली कोथिंबीर – १ टी स्पून.
- हिरवी मिरची जाडसर वाटून - १/२ टी स्पून.
- आले लसूण क्रश - १/२ टी स्पून.
- धने जिरे पावडर - १/२ टी स्पून.
- चाट मसाला - १ चिमूटभर.
- गरम मसाला पावडर १/२ टी स्पून.
- मीठ - चवीनुसार.
- तेल -१ टी स्पून.
- कॉर्नफ्लोअर - १ टी स्पून.
- चण्याच्या डाळीचे पीठ – १ टी स्पून.
- ब्रॅड क्रम्बस- १ टी स्पून.
- काजू – सजवतीकरिता.
कृती:
- सर्वप्रथम मटार कुकर मध्ये एक भांड्यात अगदी एक ते दोन चमचे पाण्यात उकडून घ्या. व नंतर थोडेसे जाडसर क्रश करून घ्या.
- उकडलेले बटाटे हे लहान फोडी होतील असे हातानेच कुस्करून घ्या.
- पालकाची पाने कमी पाण्यात छान उकळून घ्या व फक्त पाने वेगळी करून मिक्सर मध्ये प्युरी करून घ्या.
- एका पॅन मध्ये १/४ टी स्पून तेल घालून गरम करा. आता त्यात आले लसूण पेस्ट घालून छान तांबूस रंगावर परतून घ्या.
- त्यात हिरवी मिरचीची भरड घाला थोडे परतून घ्या. तयानंतर त्यात धने जिरे पूड, चाट मसाला, चण्याच्या डाळीचे पीठ व कोथिंबीर घालून भाजून घ्या.
- आता क्रश मटार घालून छान परतून घ्या त्यानंतर पालकची प्युरी घालुन मिश्रण छान एकजीव तसेच कोरडे होईपर्यंत परतवून घ्या.
- आता मिश्रण गॅस वरून उतरवा थोडे थंड झाले की त्यात कुस्कसरलेले बटाटे घालून मिश्रण अलगदपणे एकत्र करून घ्या. आता त्यात ब्रेडक्रम्ब्स, कॉर्नफ्लोअर व चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्या.
- आता हाताला थोडेसे तेल लावून एकसमान आकाराचे गोल किंवा तुमच्या आवडीच्या आकाराची चपट अशी टिकी करून घ्या त्यावर मध्ये काजू किंवा आपल्या आवडीचे ड्रायफ्रूट रोवून सजवा.
- आता एका पॅन मध्ये १/२ टी स्पून तेल गरम करून घ्या. त्यात एक एक टिकी ठेवून घ्या, दोन टिकी मध्ये किमान एक इंचाचे अंतर राहू द्या. जेणेकरून टिकी पलटताना ती तुटणार नाही.
- टिकी तांबूस रंगावर परतून घ्या त्यानंतर ती पलटून थोडेसे बाजूने तेलाचे थेंब सोडा व छान तांबूस रंगावर परतवून घ्या.
- हरा भरा कबाब तयार आहे, हे कबाब हिरवी चटणी, सॉस किंवा मायोनीस सोबत सर्व करा.
- तर ही सोपी पौष्टिक रेसिपी नक्की करून पाहा, आवडली तर कंमेंट आणि शेअर नक्की करा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा